|| अकरा मारुती ||

समर्थ रामदास स्वामी हे मारुतीरायांचे निस्सीम भक्त होते. मारुतीराय हेच समर्थांचे प्राणनाथ. समर्थांनी आसेतुहिमाचल शेकडो मारुती मंदिरांची स्थापना केली. समर्थस्थापित मारुती मंदिर जसे श्रीक्षेत्र वाराणसीला आहे तसेच ते दक्षिणेमध्ये रामेश्वरम येथेदेखील आहे. मारुतीरायांच्या उपासनेतून सर्वजण भक्तिमार्गाला लागावेत, सर्वत्र चैतन्य निर्माण व्हावे, बलशाली आणि विजयशाली राष्ट्र निर्माण व्हावे, हीच या मठ-मंदिरांच्या स्थापनेमागची भावना होती. सद्गुणधाम मारुतीरायांची गुणसंपदा त्यांच्या भक्तांनीदेखील अंगी बाणवून आपल्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचा उद्धार करून घ्यावा, असा समर्थ रामदास स्वामींचा उपदेश आहे.

मारुतीराय हे अकरावे रुद्र आहेत. श्रीमत् दासबोधातील अकराव्या दशकाचे नाव भीमदशक असे आहे. समर्थांनी अकराव्या दशकाला मारुतीरायांचे भीम हे नाव दिले आहे. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतींपैकी महाराष्ट्रामधील अकरा मारुती सुप्रसिद्ध आहेत. या अकरा मारुतींना वारीचे मारुती असेही म्हटले जाते. अनेक भाविक अकरा मारुतींची यात्रा करतात. चार धाम, बारा ज्योतिर्लिंगे, देवीची शक्तीपीठे आणि अष्टविनायक यांप्रमाणेच अकरा मारुतींचे महत्त्व आहे. 

11 MARUTI MAP

अकरा मारुती ही जागृत, शक्तीसंपन्न तीर्थक्षेत्रे आहेत. या स्थानांचा महिमा अधिकारी साधकच समजू शकतात. म्हणूनच समर्थ म्हणतात,

अक्रा अक्रा बहू अक्रा | काय अक्रा कळेचिना | 

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदभुवनीं ||

                –  आनंदवनभुवनी , ओवी  क्र. १७

अकरा मारुतींची स्थाने व त्यांचे स्थापना सन खालीलप्रमाणे

श्रीसमर्थांच्या अधिकारी शिष्या श्रीवेणास्वामींनी त्यांच्या एका रचनेमध्ये ११ मारुतींचा उल्लेख केला आहे

चाफळामाजी दोन उंब्रजेसी येक 

पारगांवी देख चौथा तो हा ।।१।।

पांचवा मसुरी शाहपुरी सहावा । 

जाण तो सातवा शिराळयात ।।२।।

सिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा । 

दहावा जाणावा माजगावी ।।३।।

बह्यात अकरावा येणे रीती गावा । 

सर्व मनोभावा पुरवील ।।४।।

वेणी म्हणे स्वामी रामदास समर्थ । 

कीर्ती गगनात न समाये ।।५।।

या अकरा मारुतींचा उल्लेख श्रीगिरीधरस्वामीकृत श्री समर्थ प्रताप या ग्रंथात खालीलप्रमाणे आहे

बाहोग्रामी शक्तिग्रामी ।

मसुरग्रामी पूर्वग्रामी ।

उदंबरग्रामी शृंगग्रामी | 

हनुमान स्थापिले समर्थे ।।

बाहोग्रामी उपग्रामी स्थान । 

मानसग्रामी पारग्रामी हनुमान ।

अधिष्ठांनी महारुद्र मुख्य प्राणनाथ निधान । 

पूर्वपश्चिमे स्थापिले समर्थे ।।

              – श्री समर्थ प्रताप, ३ – ५८, ५९

समर्थशिष्य अनंतकवी यांनीदेखील आपल्या काव्यामध्ये अकरा मारुतींविषयी खालील श्लोक लिहिला आहे

जेणे रुद्र दहा मनोहरजगी 

येकागळे स्थापिले।

प्रत्येकी अकरा बिघे नृपतीच्या 

मुद्रांकिते अर्पिले।

त्या त्या नागरिकां जना नवविधा 

भक्तीस लावीतसें।

ऐसा सद्गुरू हा अनंतकविचा 

बद्धास तारीतसे।।

                –  अनंतकवीकृत श्रीसमर्थस्तवन

समर्थस्थापित अकरा मारुती ही वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत, हे वरील सर्व संत साहित्याच्या आधारे सिद्ध होते. हे सर्व मारुती सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये आहेत. या अकरा मारुतींचे महात्म्य फार मोठे आहे. समर्थस्थापित दैवतांमध्ये अकरा मारुतींचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कृष्णाकाठी वसलेला उंब्रजचा मारुती हा या अकरा मारुतींपैकी एक आहे. 

अकरा मारुती दर्शन