उपक्रम
उंब्रज येथील श्रीसमर्थ मारुती मठाच्या शिखराचा जीर्णोद्धार
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र उंब्रज येथील श्रीसमर्थ मारुती मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले. उंब्रज मठातील श्रीसमर्थ मारुती मंदिराचे मूळ बांधकाम हे दगड व चुना यांपासून करण्यात आलेले आहे. साधारण ६० ते ७० वर्षांपूर्वी मंदिराच्या कळस व छतावर सिमेंटचा एक थर देऊन मंदिराचे मजबूतीकरण व पावसापासून संरक्षित करण्याचे काम करण्यात आले होते. कालमानाप्रमाणे हा थर जीर्ण होऊन त्याच्या आत पाणी मुरायला सुरुवात झाली होती. यावर उपाय म्हणून इ. स. २०२०मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने वॉटरप्रूफिंगचे काम हाती घेण्यात आले. प्रथम जुना सिमेंटचा थर पूर्णपणे काढून त्यावर म-३० सिमेंटचा थर देण्यात आला. त्यावर २० मिलीमीटर जाडीचा जलरोधक सिमेंटचा थर देण्यात आला. त्यावर जीआरपी जलरोधकांचा थर देऊन मग अक्रिलिकचा थर देण्यात आला. सर्वात शेवटी त्यावर जलरोधक रंग देण्यात आला.
मंदिराच्या दगडी भिंतीवर जुन्या काळात ऑईलपेंट देण्यात आला होता. तो रंग रसायने वापरून काढण्यात आला. दगडांच्या मधील चिरा मोकळ्या करून त्या परत नवीन सिमेंट व जलरोधक रसायन यांनी भरून घेण्यात आल्या. दगडी भिंतींवर पारदर्शक सिलिकॉन वॉटर रीपेलंटचे नवीन थर देण्यात आले.
हे जीर्णोद्धाराचे काम मार्च २०२०मध्ये सुरु होऊन सप्टेंबर २०२०मध्ये पूर्ण झाले.
उंब्रज येथील श्रीकेशवस्वामी समाधी वृंदावनाचा जीर्णोद्धार
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक मारुती श्रीक्षेत्र उंब्रज येथे आहे. या मठाचे आद्य मठपती श्री केशवस्वामी गोसावी हे श्रीसमर्थशिष्य योगिराज कल्याणस्वामी यांचे शिष्य. आपले संपूर्ण जीवन श्रीरामकार्यामध्ये समर्पित केल्यानंतर भाद्रपद अमावस्या, शके १६५५, इसवी सन १७३३ या तिथीला श्रीकेशवस्वामींनी उंब्रज येथेच श्रीमारुतीरायांच्या चरणी आपली प्राणज्योत विलीन केली. भाद्रपद अमावस्या (सर्वपित्री अमावस्या) यादिवशी श्रीकेशवस्वामींचे पुण्यस्मरण असते. त्यांचे समाधी वृंदावन उंब्रज येथे कृष्णा नदीच्या काठी आहे.
कालमानाप्रमाणे व पावसाळ्यात येणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे साधारणतः तीन शतकांपूर्वीच्या समाधी वृंदावनाचे मूळ स्वरूप तसेच ठेवून जीर्णोद्धार करणे आवश्यक होते. त्यानुसार श्रीकेशवस्वामींचे वंशज आणि उंब्रज मठपती श्री. सुरेश रघुवीरबुवा रामदासी यांच्या वतीने वृंदावनाच्या जीर्णोद्धाराचे काम नुकतेच हाती घेण्यात आले. वृंदावनाच्या दगडी भिंतीवर जुन्या काळात ऑईलपेंट देण्यात आला होता. तो रंग रसायने वापरून काढण्यात आला. दगडांच्या मधील चिरा मोकळ्या करून त्या परत नवीन सिमेंट व जलरोधक रसायन यांनी भरून घेण्यात आल्या. दगडी भिंतींवर पारदर्शक सिलिकॉन वॉटर रीपेलंटचे नवीन थर देण्यात आले. समाधीचे जतन होण्याच्या दृष्टीकोनातून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पूर्णत्वास गेले. जीर्णोद्धाराचे काम सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले.
॥ उंब्रज येथे श्रीकेशवस्वामी यांची समाराधना ॥
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक मारुती श्रीक्षेत्र उंब्रज येथे आहे. या मठाचे आद्य मठपती श्री केशवस्वामी गोसावी हे श्रीसमर्थशिष्य योगिराज कल्याणस्वामी यांचे शिष्य. आपले संपूर्ण जीवन श्रीरामकार्यामध्ये समर्पित केल्यानंतर भाद्रपद अमावस्या, शके १६५५, इसवी सन १७३३ या तिथीला श्रीकेशवस्वामींनी उंब्रज येथेच श्रीमारुतीरायांच्या चरणी आपली प्राणज्योत विलीन केली. भाद्रपद अमावस्या (सर्वपित्री अमावस्या) यादिवशी श्रीकेशवस्वामींचे पुण्यस्मरण असते.
या वर्षी सर्वपित्री अमावस्या दि. ६-१०-२०२१ रोजी श्रीकेशवस्वामी यांची समाराधना करण्यात आली. श्रीकेशवस्वामींचे वंशज आणि उंब्रज मठपती श्री. सुरेश रघुवीरबुवा रामदासी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. समाराधनेच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी श्रीकेशवस्वामी यांच्या समाधीला रुद्रावर्तनासह अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील वेदमूर्ती विनयशास्त्री गोडबोले गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाराधनेला सुरुवात झाली. सातारा, कराड व पुणे येथील एकूण २० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत समाराधनेचा कार्यक्रम पार पडला. ब्रह्मवृंदांचे चरण प्रक्षालन करून ते तीर्थ एका कळशीमध्ये घेऊन त्याची विधिवत पूजा करण्यात आली. नैवेद्य अर्पण करण्यात आला.
याच कार्यक्रमामध्ये उंब्रज मठ व श्रीकेशवस्वामी यांच्याविषयी एक माहितीपर पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. उपस्थित ब्रह्मवृदांना मान्यवरांच्या हस्ते ही पुस्तिका भेटस्वरूप देण्यात आली. श्रीकेशवस्वामी समाराधना कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ प.पू. आक्कास्वामी रथयात्रेचे उंब्रज मठामध्ये स्वागत ॥
शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी श्रीसमर्थशिष्या प. पू. आक्कास्वामी यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेचे श्रीसमर्थ मारुती मंदिर उंब्रज येथे स्वागत करण्यात आले. उंब्रज मठपती श्री. सुरेशबुवा रामदासी यांच्या हस्ते पादुकांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरज मठपती श्री. कौस्तुभबुवा रामदासी यांच्या शिष्या कु. वेदश्री सुहास जोशी, सांगली यांनी कीर्तनसेवा सादर केली. श्रीवेणास्वामी यांची सद्गुरुभक्ती व त्यांचे कार्य ह्यावर अतिशय रसाळ कीर्तन झाले. श्रीवेणास्वामींनी लिहिलेल्या “बंधविमोचन राम ” या पदाने कीर्तनाची सांगता झाली.
दुपारी सर्वांना पारंपरिक पद्धतीप्रमाणे प्रसादाचे वाटप करण्यात आले. नंतर श्रीआक्कास्वामींच्या पादुका उंब्रज मठाचे आद्य मठपती श्रीकेशवस्वामी गोसावी यांच्या समाधी वृंदावनाच्या स्थानी नेऊन संतभेटीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रथयात्रेने पुढे प्रस्थान केले. यावेळी श्रीरामदासस्वामी संस्थानचे स.भ.श्री. नंदकुमार मराठे, स.भ. श्री. सुरेशबुवा सोन्ना रामदासी, सज्जनगड, स.भ.श्री.कौस्तुभबुवा रामदासी व मान्यवर उपस्थित होते.