|| श्रीकेशवस्वामी ||

श्रीकेशवस्वामी हे उंब्रज मठाचे आद्य मठपती आहेत. श्रीकेशवस्वामी हे योगिराज श्रीकल्याणस्वामींचे शिष्य होते. श्रीसमर्थ रामदास स्वामी – योगिराज श्रीकल्याणस्वामी – श्रीकेशवस्वामी अशी ही गुरुशिष्य परंपरा आहे. उपलब्ध साहित्याच्या आधारे श्रीकेशवस्वामींविषयी माहिती खालीलप्रमाणे

सज्जनगडावर श्रीकेशवस्वामी

माघ वद्य नवमी, शके सोळाशे तीनमध्ये (इ. स. १६८२) श्रीसमर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडावर अवतार संपूर्ण केला. त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन समर्थशिष्य श्रीभीमस्वामी तंजावरकर यांनी पन्नास ओव्यांमध्ये केले आहे. या ओव्यांमध्ये श्रीकेशवस्वामी यांचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे.

तेही चवदा मणाच्या मूर्ती ।

लक्ष्मणसीतामारुती ||

आणि चवथा दाशरथी | 

रामचेंद्र ||

केल्या सत्वर पाठविल्या |

केशवनिस्प्रही आणिल्या ||

माघ व|| ५ आल्या |

मोहछाया ||

       – ओवी क्र. ३४ व ३५

हा संपूर्ण प्रसंग पुढीलप्रमाणे. समर्थ रामदास स्वामी दक्षिण भारताच्या यात्रेस गेले असताना तंजावरला गेले होते. तेथे अरणीकर नावाच्या अंध कारागिराला श्रीसमर्थांनी प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण महाराज आणि मारुतीराय यांच्या मूर्ती करण्याची आज्ञा केली. या मूर्ती आणण्यासाठी सज्जनगडावरून श्रीकेशवस्वामी तंजावरास गेले होते. ते तंजावरहून या मूर्ती घेऊन माघ वद्य पंचमीला सज्जनगडावर परत आले. याच प्रसंगाचा उल्लेख श्रीभीमस्वामींनी  वरील ओव्यांमध्ये केला आहे. येथे श्रीकेशवस्वामींना ‘केशव निस्पृह’ असे संबोधण्यात आले आहे.

पुढे श्रीसमर्थांनी याच मूर्तींचे अखंड ध्यान करून माघ वद्य नवमीला अवतार संपूर्ण केला. श्रीउद्धवस्वामींच्या हस्ते श्रीसमर्थांच्या पार्थिवाचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे श्रीकेशवस्वामी उपस्थित होते, असे परंपरेने सांगितले जाते. अंतिम संस्कार झाल्यानंतर श्रीसमर्थांच्या अस्थी चाफळ येथील वृंदावनामध्ये स्थापित करण्यात आल्या.  या घटनेनंतर  सन १६८२ ते सन १७१४ अशी जवळजवळ ३२ वर्षे श्रीकेशवस्वामींनी या अस्थींची सेवा केली. चाफळ येथील वृंदावनाची ३२ वर्षे निष्ठेने सेवा करणारे श्रीकेशवस्वामी हे श्रीसमर्थांचे अनन्य भक्त होते.

चाफळ

श्रीकेशवस्वामींच्या चरित्रामध्ये श्रीक्षेत्र चाफळशी संबंधित आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. चाफळ म्हणजे रामदासी संप्रदायाचे मुख्य केंद्र. चाफळ ते उंब्रज हे अंतर ११ कि.मी. इतके आहे. चाफळ येथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य श्रीराम मंदिर आहे. चाफळमधून मांड नावाची वाहते. श्रीकेशवस्वामींनी या मांड नदीच्या काठी घाट बांधल्याचा उल्लेख श्रीगिरीधरस्वामी कृत ‘श्री समर्थ प्रताप’ या ग्रंथामध्ये आहे.

चाफळी केशवाची नदीतटरचना | 

नाना कार्यभागाची विवंचना |

नाना राजकारण दीर्घसूचना | 

जनार्दन महाराष्ट्र यात्रा आणितसे ||

                   –  श्री समर्थ प्रताप, १०-८४

श्रीकेशवस्वामींनी चाफळ येथे नदीच्या काठी घाट बांधवून घेतला. त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या समर्थकार्याविषयी मंथन सुरू असायचे. अत्यंत विचारपूर्वक राजकारण करून समर्थ रामदास स्वामींना अभिप्रेत असणारे आनंदवनभुवन साकारण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. श्रीकेशवस्वामींना साधारणत: समकालीन असणाऱ्या श्रीगिरीधरस्वामींनी केलेला गौरव वाचून आपण त्यांचा अधिकार समजू शकतो.

रामदासी सांप्रदायिक कागदपत्रे खंड १ या ग्रंथामध्येदेखील श्रीकेशवस्वामींनी चाफळ येथील नदीवर घाट बांधल्याचे उल्लेख आहेत. त्यानुसार नदीच्या प्रवाहामुळे मंदिराजवळची दरड कोसळली होती. त्यामुळे मंदिराच्या वास्तूला उपसर्ग पोहोचू शकला असता. मंदिर सुरक्षित राहावे म्हणून नदीच्या काठी घाट बांधण्यासाठी श्रीकेशवस्वामींनी भिक्षा मागितली. भिक्षेतून दगडी चिरे उपलब्ध झाले आणि घाटाची बांधणी करण्यात आली. हा कालखंड साधारण सन १७०७च्या सुमारासचा आहे.

श्रीसमर्थ आणि श्रीकल्याणस्वामी यांच्या अस्थींचे विसर्जन

रामदासी सांप्रदायिक कागदपत्रे खंड-१ मध्ये उंब्रज मठाची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांपैकी अनेक पत्रांमध्ये ‘श्रीकल्याणस्वामींचे शिष्य श्रीकेशवस्वामी’ अशा आशयाचे उल्लेख आहेत. श्रीकेशवस्वामींची त्यांचे सद्गुरू योगिराज श्रीकल्याणस्वामींचे ठायी अनन्य भक्ती होती. श्रीकेशवस्वामींनी श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि योगिराज श्रीकल्याणस्वामी यांच्या अस्थींचे एकत्रित विसर्जन केले. तो प्रसंग मोठा विलक्षण आहे. 

श्रीकेशवस्वामी प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला डोमगाव येथे सद्गुरू श्रीकल्याणस्वामींच्या दर्शनासाठी येत असत. त्यावेळी सद्गुरू समर्थांच्या अस्थीविसर्जनाविषयी ते श्रीकल्याणस्वामींकडे प्रार्थना करत असत. परंतु श्रीकल्याणस्वामींकडून याबाबत त्यांना आज्ञा होत नसे. हा क्रम सन १६८२ ते सन १७१३ असा तीस वर्षांहून अधिक काळ चालला. परंतु सन १७१४मध्ये एक अद्भूत प्रसंग घडला. त्यावर्षी आषाढ महिना हा अधिक मास होता. या आषाढ पौर्णिमेला अर्थात गुरुपौर्णिमेकरता डोमगावला जाताना चाफळ येथील वृंदावनातून श्रीसमर्थांच्या अस्थी घेऊन जावे आणि तिथून पुढे श्रीक्षेत्र काशीमध्ये अस्थी विसर्जन करावे, असे श्रीकेशवस्वामींनी ठरवले. त्यानुसार अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके सोळाशे छत्तीस, (सन १७१४) रोजी श्रीकेशवस्वामींनी चाफळ येथील वृंदावनातून अस्थी काढल्या. त्यावेळी इकडे परंडा मठामध्ये योगिराज श्रीकल्याणस्वामी रामकथा सांगत होते. साक्षात श्रीकल्याणस्वामींच्या मुखातून रामकथा ऐकण्यासाठी परंड्यामध्ये साधूसंतांची मांदियाळी जमली होती.  आषाढ शुद्ध त्रयोदशीला रामकथा संपूर्ण झाली. आणि अद्भूत घडले. ज्या क्षणी श्रीकेशवस्वामींनी चाफळच्या वृंदावनातून अस्थी बाहेर काढल्या, त्याच क्षणी आपली सद्गुरू माउली अंतिम प्रवासाला निघाली आहे, हे योगिराज श्रीकल्याणस्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणले. त्याच क्षणी योगिराज श्रीकल्याणस्वामी योगमार्गाचा अवलंब करून समर्थचरणी विलीन झाले. श्रीकल्याणस्वामी समाधिस्थ झाले. त्यानंतर डोमगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीकेशवस्वामी डोमगावला पोहोचले. तिथे त्यांना ही वार्ता कळाली. श्रीकेशवस्वामी पोहोचले त्यादिवशी श्रीकल्याणस्वामींच्या अस्थी एकत्र करण्यात आल्या होत्या. हे दृश्य पाहून ते कळवळले. त्यांनी शोक केला. सद्गुरूभक्त महात्म्याची अगम्य लीला पाहून ते विस्मित झाले. सर्व विधी यथासांग पूर्ण केल्यानंतर श्रीसमर्थ आणि श्रीकल्याणस्वामी यांच्या अस्थी घेऊन श्रीकेशवस्वामी श्रीक्षेत्र काशीला गेले. श्रीकेशवस्वामींच्या हस्ते दोघांच्याही अस्थींचे एकत्र विसर्जन झाले. या प्रसंगाविषयी दासविश्रामधामकार श्रीआत्माराम स्वामी म्हणतात,

ऐसे कोठे नाही हो वर्तले | 

सांगायासी ऐकायासी गोष्टी झाली |

                         – दासविश्रामधाम

श्रीकल्याणस्वामींनी आजन्म श्रीसमर्थसेवा केली आणि त्यांचे अस्थीविसर्जनही एकत्रच झाले. याविषयी श्रीआत्मारामस्वामी म्हणतात,

धन्य धन्य हे गुरुशिष्यपण | 

धन्य धन्य हे सेवाविधान |

धन्य धन्य हे अभेदलक्षण | 

धन्य धन्य लिळा अगाध ||

                         – दासविश्रामधाम

श्रीकेशवस्वामींच्या हस्ताक्षरातील श्रीमत् दासबोध

श्रीकेशवस्वामींच्या हस्ताक्षरातील श्रीमत् दासबोध डोमगाव मठामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. हा ग्रंथराज अत्यंत मौल्यवान आहे. या दासबोधाचे लेखन सोनेरी आणि चंदेरी शाईने करण्यात आले आहे. श्रीकेशवस्वामींच्या हस्ताक्षरातील श्रीमत् दासबोध हा अनमोल ठेवा आहे.

श्रीकेशवस्वामींची समाधी

प्रारंभीचा काही काल साताऱ्याजवळील कोडोली येथे व्यतीत केल्यानंतर श्रीकेशवस्वामी उंब्रज येथे वास्तव्यास आले.  आपले संपूर्ण जीवन श्रीरामकार्यामध्ये समर्पित केल्यानंतर भाद्रपद अमावस्या, शके १६५५, इसवी सन १७३३ या तिथीला श्रीकेशवस्वामींनी उंब्रज येथेच श्रीमारुतीरायांच्या चरणी आपली प्राणज्योत विलीन केली. भाद्रपद अमावस्या (सर्वपित्री अमावस्या) यादिवशी श्रीकेशवस्वामींचे पुण्यस्मरण असते. त्यांचे समाधी वृंदावन उंब्रज येथे कृष्णा नदीच्या काठी आहे.

श्रीकेशवस्वामी हे रामदासी संप्रदायातले अलौकिक महात्मे होते. त्यांनी चाफळ आणि उंब्रज या दोन्ही क्षेत्रांची व्यवस्था यथोचित सांभाळली. अकरा मारुतींपैकी एक असलेल्या उंब्रजचे मठपती म्हणून त्यांनी मारुतीरायांची सेवा केली. आजही सद्भक्तांना श्रीकेशवस्वामींच्या कृपेची प्रचीती येते. श्रीकेशवस्वामींच्या पश्चात उंब्रज मठामध्ये वंशपरंपरेने मठपती झाले. ही परंपरा आजही सुरु आहे. उंब्रज मठाची परंपरा खालीलप्रमाणे. 

|| परमपूज्य सद्गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी ||

|| परमपूज्य सद्गुरु योगिराज श्रीकल्याणस्वामी ||

(श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य)

|| परम पूज्य सद्गुरु श्रीकेशवस्वामी ||

(योगिराज श्रीकल्याणस्वामी यांचे शिष्य, उंब्रज मठाचे आद्यमठपती)

श्रीकेशवस्वामींपासून वंशपरंपरेने चालत आलेली हीच उपासना रामदासी कुटुंबीय अविरतपणे आजही पार पाडत आहेत.

** वंश परंपरा **

श्री. मल्हार केशव गोसावी

(उंब्रज मठाचे आद्यमठपती श्रीकेशवस्वामी गोसावी यांचे सुपुत्र )

श्री. केशव मल्हार गोसावी

(उंब्रज मठाचे आद्यमठपती श्रीकेशवस्वामी गोसावी यांचे नातू )

श्री. रामचंद्र केशव गोसावी

श्री. हनुमंत रामचंद्र गोसावी

श्री. सीताराम हनुमंत गोसावी

श्री. हनुमंत सीताराम गोसावी * श्री. रघुनाथ सीताराम गोसावी

श्री. रामकृष्ण हनुमंत रामदासी

श्री. रघुवीर रामकृष्ण रामदासी * श्री. हनुमंत रामकृष्ण रामदासी * श्री. विनायक रामकृष्ण रामदासी

श्री. सुरेश रघुवीर रामदासी * श्री. अमेय हनुमंत रामदासी

श्रीकेशवस्वामींचे काव्य

श्रीकेशवस्वामींद्वारा रचित एक काव्य श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे येथील बाडांक १०३ मध्ये उपलब्ध आहे. ते ‘समर्थशिष्य कल्याण’ या ग्रंथामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

|| भवभय कैचे राघवाच्या नामी ||

कल्याण तो स्वामी प्राप्त होय कैसा | 

जरी घडे ऐसा भक्तीभाव ||

भावे भक्ति घडे नवविधा जरी | 

ते चि पै विवरी परीक्षीती ||

परीक्षीती राया श्रवण घडले | 

कीर्तन जोडले नारदासी ||

नारदाच्या मुखे प्रल्हादा श्रवण | 

अखंड चिंतन हरीनाम ||

हरीचे पै चरण करी संवाहन | 

लक्षुमी आपण निज हस्ते ||

निज हस्ते अर्चन प्रभूराये केले | 

वंदन घडले अक्रूरासी ||

अक्रूरा वंदन घडले देवाचे | 

दास्य राघवाचे हनुमंता ||

हनुमंता दास्य भक्तीचे घडले | 

सख्यत्व जोडले अर्जुनासी ||

अर्जुनासी सख्य देवासी जोडले | 

आत्म निवेदिले बळीराये ||

बळीराया ऐसा करिता निश्चय | 

तरी मग काय भवभय ||

भवभय कैचे राघवाच्या नामी | 

कल्याण तो स्वामी केशवाचा ||