|| गुरुशिष्य परंपरा ||
आदिनारायण सद्गुरु आमुचा |
शिष्य हो तयाचा महाविष्णू ||
तयाचा हो शिष्य जाणावा तो हंस |
तेणे ब्रह्मयास उपदेशिले ||
ब्रह्मदेवे केला उपदेश वशिष्ठा |
तेथे धरिली निष्ठा शुद्ध भाव ||
वशिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी |
श्रीरामे दासासी उपदेशिले ||
उपदेश देऊन मजला मारुती |
स्वये रघुपती निरवीला ||
निरविता तेणे जालो रामदास |
संसारी उदास जीवेभावे ||
म्हणोनि आमुचे कुळी कुळदैवत |
राम हनुमंत आत्मरुपी ||
आत्मरुपी जाला रामीरामदास |
केला उपदेश दीनोद्धारे ||
– समर्थ रामदास स्वामी
रामदासी संप्रदायाची गुरुशिष्यपरंपरा खालीलप्रमाणे
आदिनारायण – महाविष्णु – हंस – ब्रह्मदेव – वसिष्ठ ऋषी – प्रभू श्रीरामचंद्र – समर्थ रामदास स्वामी
पुढे समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यशाखा संपूर्ण भारतामध्ये विस्तारल्या. त्यापैकी उंब्रज मठाची गुरुशिष्य परंपरा खालीलप्रमाणे
समर्थ रामदास स्वामी – योगिराज श्रीकल्याणस्वामी – श्री केशवस्वामी (उंब्रज मठाचे आद्य मठपती)
|| श्रीसमर्थ रामदास स्वामी ||
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे |
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे |
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा |
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||
श्रीसमर्थ रामदास स्वामी हे ब्रह्मज्ञानी संत होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील जांब या गावी झाला. श्रीसमर्थांनी नाशिक जवळील टाकळी येथे कठोर तप करून स्वरूपानुभव प्राप्त केला. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून जागोजागी मठस्थापना केली. समर्थांनी चाफळ येथे श्रीराम मंदिर आणि याच परिसरात अकरा मारुतींची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर समाधिस्त झाले.
एका बाजूला अद्वैत वेदान्त आणि दुसरीकडे प्रभू श्रीरामचंद्रांची सगुण उपासना या दोन तटांमधून रामदासी संप्रदायाची अध्यात्मगंगा प्रवाहित झाली. श्रीसमर्थांनी सर्वांना भक्तिमार्गाचा उपदेश केला आहे. शिष्यांनी श्रवण, कीर्तन, नामस्मरण, सद्गुरूपादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीचा अंगीकार करावा. भक्तीमार्गाची कास धरून शिष्यांनी आत्मोद्धार करावा. तसेच सद्गुरूंची आज्ञा झाल्यास जगदोद्धार करावा, असा समर्थांचा उपदेश आहे. या व्यतिरिक्त शिष्यांच्या अधिकारानुसार श्रीसमर्थांनी योगमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादींचा देखील उपदेश केला आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी नाममंत्र रामदासी परंपरेचा प्राण आहे. श्रीसमर्थांनी श्रीमत् दासबोध, श्री मनाचे श्लोक, आत्माराम असे अनेक ग्रंथ लिहिले. समर्थांच्या साहित्यामध्ये जीवनाच्या प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही बाजूंविषयी सखोल मार्गदर्शन आहे. समर्थ साहित्याच्या अभ्यासामुळे संपूर्ण जीवनाचा कायापालट होतो. समर्थ साहित्यामुळे मानसिक आणि बौद्धिक विकास तर होतोच, परंतु या दैवी साहित्याच्या विवरणाने मनुष्याला त्याच्या शुद्ध आत्मस्वरूपाचे ज्ञान होते.
समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यशाखेचा विस्तार फार मोठा आहे. योगिराज श्रीकल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य होते.
|| योगिराज श्रीकल्याणस्वामी ||
कल्याणाचे नाम कल्याणकारी |
कल्याणाचे ध्यान सर्वांस तारी |
कल्याणाचा हस्त माथा जयाचे |
चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे ||
प्राचीन श्रुतींमधील धौम्य-आरुणी तसेच रामायणातील वसिष्ठ-श्रीराम किंवा पुढील काळात झालेले मत्स्येंद्रनाथ–गोरक्षनाथ असा गुरु-शिष्य परंपरेचा गंगौघ आपल्या भारतभूमीमध्ये अविरत प्रवाहीत आहे. अगदी अलीकडे म्हणजे ३०० वर्षापूर्वी या परंपरेतील एक सुवर्णपर्व साकारले. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम श्रीकल्याणस्वामी म्हणजे अद्वैताचे रोकडे प्रमाण. समर्थ रामदास स्वामी श्रीकल्याणस्वामींविषयी “याचेनि योगे मज बहु विश्रांती” असे म्हणतात. श्रीकल्याणस्वामी समर्थांचे बहिश्चर प्राण होते, असे ग्रंथ सांगतात.
श्रीकल्याणस्वामींनी श्रीसमर्थांची सर्वप्रकारे सेवा केली. सद्गुरूंची काया, वाचा, मनोभावे सेवा करणे हीच श्रीकल्याणस्वामींची मुख्य साधना होती. समर्थांच्या कृपेने श्रीकल्याणस्वामींना योगसाधनेचा लाभ झाला. त्यामुळेच श्रीकल्याणस्वामींना ‘योगिराज’ असे संबोधले जाते. ते श्रीसमर्थांच्या ग्रंथांचे लेखनिक होते. समर्थ आज्ञेनुसार श्रीकल्याणस्वामी डोमगाव, परंडा या परिसरामध्ये वास्तव्यास गेले. तेथे त्यांनी मठांची स्थापना केली. अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी शके सोळाशे छत्तीस (सन १७१४) रोजी योगिराज श्रीकल्याणस्वामी समाधिस्थ झाले. त्यांची समाधी डोमगाव येथे आहे. उंब्रज मठपती श्रीकेशवस्वामी हे श्रीकल्याणस्वामींचे शिष्य होते.