|| उंब्रज मठ ||

मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर श्रीसमर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी उंब्रज हे तीर्थक्षेत्र आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी शके १५५१, इ.स. १६४९मध्ये उंब्रज येथे श्रीप्रताप मारुतीची स्थापना केली. चुना, वाळू, ताग यांपासून बनवलेली ही मूर्ती साधारण सव्वासहा फूट उंच असून मूर्तीला चांदीचे डोळे बसविलेले आहेत. साधारणत: वर्षभरातून एकदा मूर्तीला शेंदूरलेपन केले जाते. या मारुतीला ‘उंब्रजचा मारुती’ किंवा ‘मठातील मारुती’ असेही म्हणतात. उंब्रजच्या मठातील मारुतीरायांचे रूप प्रताप मारुतीचे आहे. मारुतीरायांचे मुखमंडल अतीव मनोहर आहे. एका हातामध्ये गदा आहे. तामसी प्रवृत्तींना सुतासारखे सरळ करण्यासाठी दुसरा हात उगारला आहे. वाईट प्रवृत्तीचे प्रतीक असलेला राक्षस एका पायाखाली चिरडला आहे. पुढील मोहिमेवर जाण्याकरता मारुतीराय उड्डाणासाठी सिद्ध आहेत. इतर वेळी रामरायांपुढे हात जोडून उभे असणारे मारुतीराय अधर्माचा नाश करताना मात्र रौद्ररूप धारण करतात. तामसी, अशुभ, वाईट प्रवृत्तींचा समूळ नायनाट करतात.

उंब्रजचा मठ पूर्वाभिमुख आहे. योगिराज श्रीकल्याणस्वामींचे शिष्य श्रीकेशवस्वामी हे उंब्रज मठाचे आद्य मठपती आहेत. ‘दासविश्रामधाम’ या ग्रंथातील उल्लेखानुसार मारुतीरायांच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थ रामदास स्वामींनी उंब्रज येथे सलग १३ दिवस किर्तन केले. श्रीसमर्थांच्या वापरात असलेली कुबडी मठात आजही जतन करून ठेवलेली आहे. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. समर्थ रामदास स्वामी चाफळवरून उंब्रज येथे स्नानासाठी येत असत. एक दिवस कृष्णा नदीमध्ये स्नान करत असताना प्रत्यक्ष मारुतीरायांनी समर्थांना दर्शन दिले. मारुतीरायांच्या पावलांचा ठसा तेथील एका शिळेवर उमटल्याचेही दाखवले जात असे. हा सर्व परिसर अतिशय पवित्र व मंगलमय आहे. 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला मठामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी उंब्रज येथे ‘रामदासी सांप्रदायिक भिक्षेचा’ कार्यक्रम होतो. मठामध्ये दैनंदिन उपासना होते. तसेच श्रीमत् दासबोधाचे नित्यवाचन, श्रीमत् दासबोध पारायण, श्रीमत् ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. सर्वपित्री अमावास्येला उंब्रज मठाचे आद्य मठपती श्रीकेशवस्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम असतो. समर्थशिष्या श्रीसंत वेणास्वामी यांची पालखी सज्जनगड येथे जाताना उंब्रज मठात दर्शनाला येते. या व्यतिरिक्त मठामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. आजवर मठामध्ये अनेक संत-सत्पुरूष, किर्तनकार, प्रवचनकार यांचे दर्शनानिमित्त येणे झालेले आहे. उंब्रजच्या मठामध्ये मारुतीरायांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भक्तमंडळी निरंतर येत असतात.

ध्वनिमुद्रित पाचवे मारुती स्तोत्र

पाचवे मारुती स्तोत्र

समर्थ रामदास स्वामींद्वारा रचित मारुती स्तोत्रांपैकी ‘हनुमंता रामदूता’ हे पाचवे मारुती स्तोत्र उंब्रज मठातील मारुतीरायांवर रचलेले आहे. उंब्रज मठामध्ये या स्तोत्राचे नित्य पठण केले जाते.

|| हनुमंता रामदूता ||

हनुमंता रामदूता । वायुपुत्रा महाबळी । 

ब्रह्मचारी कपीनाथा । विश्वंभरा जगत्पते ॥

दानवारि कामांतका । शोकहारी दयानिधे । 

महारुद्रा मुख्य प्राणा । कूळमूर्ती पुरातना ॥

वज्रदेही शोकहारी । भीमरुपा प्रभंजना । 

पंचभूतां मूळमाया । तूंचि कर्ता सकळहि ॥

स्थितीरुपें तूंचि विष्णु । संहारक पशूपते । 

परात्परा स्वयंज्योती । नामरुपा गुणातिता ॥

सांगतां वर्णितां येना । वेदशास्रा पडे ठक । 

शेष तो शिणला भारी । नेति नेति परा श्रुती ॥

धन्य अवतार कैसा हा । भक्तांलागिं परोपरी । 

रामकार्य उतावेळा । भक्तरक्षकसारथी ॥

वारितो दुर्घटे मोठीं । संकटीं धांवतो त्वरें । 

दयाळा हा पूर्ण दाता । नाम घेतांच पावतो ॥

धीर वीर रणी मोठा । मागें नव्हेचि सर्वथा । 

उड्डाण अद्भुत ज्याचें । लंघिलें समुद्राजळे ॥

दाउनी लिखिता हाती । नमस्कारी सितावरा । 

वाचितो सौमित्र अंगें । राम सुखें सुखावला ॥

गर्जतो स्वानंदमेळीं । ब्रह्मानंद सकळहि । 

अपार महिमा मोठा । ब्रह्मांदिकांसि नाकळे ॥

अद्भुत पुच्छ तें कैसें । भोवंडी नभ पोकळी । 

फांकलें तेज तें भारी । झांकिलें सूर्यमंडळा ॥

देखतां रूप पैं ज्याचें । ठाणं अद्भुत शोभलें । 

ध्वजांग ऊर्ध्व तो बाहु । वामहस्त कटावरी ॥

कासिले हेमकासोटी । घंटा किंकिण भोंवत्या । 

मेखळे जडलीं मुक्तें । दिव्य रत्न परोपरीं ॥

माथा मुगुट तो कैसा । कोंटि चंद्रार्क लोपले । 

कुंडलें दिव्य तीं कानीं । मुक्तमाळा विराजती ॥

केशर रेखिले भाळीं । मुख सुहास्य चांगलें । 

मुद्रिका शोभती बोटी । कंकण कर मंडित ॥

चरणीचे वाजती अंदू । पदीं तोडर गर्जती । 

कैवारी नाथ दीनाचा । स्वामि कल्याणदायकू ॥

स्मरतां पाविजे मुक्ती । जन्ममृत्यासी वारितो । 

कांपती दैत्य ते ज्यासी । भुभु:कार देतां बळें ॥

पाडितो राक्षस नेटें । आपटी महिमंडळी । 

सुमित्रप्राणदाताच । कपिकूळांत मंडणू ॥

दंडिली पाताळी शक्ति । अहीमही निर्दाळिले । 

सोडिले रामचंद्राला । कीर्ति ही भुवनत्रयीं ॥

विख्यात ब्रीद तें कैसें । मोक्षदाता चिरंजीव । 

कल्याण याचिये नामें । भूत पिशाच्च कांपती ॥

सर्पवृश्चिक श्वापदादि | विष शीत निवारक । 

आवडी स्मरतां भावें । काळ कृतांत कापती ॥

संकटी विध्वंसितो बाधा । दु:खदरिद्र नासती । 

ब्रह्मग्रहपिडाव्याधि । ब्रह्महत्यादि पातकें ॥

पुरवितो सकळहि आशा । भक्तकामकल्पतरू । 

त्रिकाळ पठतां स्तोत्र । इच्छिलें पाविजे जनीं ॥

परंतु पाहिजे भक्ति । संदेह कांहीं धरूं नका । 

रामदासी साहाकारी । सांभाळीतो परोपरी ॥

॥ इति श्रीरामदास कृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्रं संपूर्णम् ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥